जनावरांमधील लम्पी स्कीन डीसिज रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती
जनावरांमधील लम्पी स्कीन डीसिज रोखण्यासाठीजिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वितजिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती
![]() |
| Image Source - Google | Image By - Amarujala |
धुळे :-
धुळे जिल्ह्यात लम्पी स्कीन डीसिज या रोगाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी पशुपालक, सामान्य नागरिक, क्षेत्रीयस्तरावरील कार्यरत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, पारोळा रोड, धुळे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लम्पी स्कीन डीसिज या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तालुका किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
राज्यात लम्पी स्कीन डीसिज या आजाराचा प्रसार प्रथम गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च 2020 मध्ये दिसून आला. धुळे जिल्ह्यात सन 2021- 22 मध्ये धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला.
लम्पी स्कीन डीसिज हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा रोग मुख्यत्वे गायी व म्हशींमध्ये आढळून येतो. विदेशी वंशाच्या आणि संकरित गायींमध्ये देशी वंशाच्या गायींपेक्षा रोग बाधेचे प्रमाण अधिक आहे. उष्ण व दमट हवामान रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणाऱ्या मर्तुकीचे प्रमाण कमी असले, तरी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन घटते. काही वेळेस गर्भपात होवून प्रजनन क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते.
या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलट्यांर्मात होतो. हा आजार झालेल्या जनावरांमध्ये डोळे व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथींना सूज येणे, भरपूर ताप येणे, दुग्धोत्पादन कमी होणे, चारा कमी खाणे, पाणी पिणे कमी होते. त्वचेवर गाठी येतात ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. धुळे जिल्ह्यात सध्या धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. धुळे परिसरातही लम्पी सदृश जनावरे आढळून आली आहेत. त्यांच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यांचे रोग नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आजारी जनावरांवर उपचार व इतर जनावरांना हा आजार होवू नये म्हणून लसीकरण करण्यात आले आहे.
या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधासाठी रोग प्रादुर्भावादरम्यान विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी या आजाराचा प्रसार मुख्यत्व चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलट्यांमार्फत होत असल्याने कीटकनाशक औषधांची गोठ्यात फवारणी करावी. तसचे गावांत कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. सध्या भारतात या रोगावर खात्रीशीर आणि प्रभावशाली रोग प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. मात्र, शेळ्यांमधील देवी रोगावर वापरण्यात येणारी गोट पॉक्स ही लस वापरून हा रोग आटोक्यात आणता येवू शकतो. प्रादुर्भावग्रस्त भागात जनावरांची ने- आण व जनावरांच्या संपर्कातील माणसांच्या हालचाली टाळणे आवश्यक आहे. तसेच जनावरांच्या बाजारात फक्त लसीकरण व टॅग असलेल्या जनावरांनाच प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोगप्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याबाबत व रोग प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असे :
डॉ. एस. पी. विसावे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, 82755-63504. डॉ. आर. एस. लंघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे, 98222-90228. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक असे : डॉ. ए. टी. वाडीले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, धुळे- 94224- 03769. डॉ. भूषण वाकडे, पशुधन विकास अधिकारी, धुळे- 90295-13182. डॉ. एन. पी. ठाकूर, पशुधन विकास अधिकारी, धुळे- 94201- 41800.
तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक असे :
डॉ. प्रशांत निकम, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, धुळे- 95106-64391. डॉ. बी. टी. देसले, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, शिंदखेडा- 70837-19337, डॉ. एस. के. कुवर, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, शिरपूर- 94032- 43225. डॉ. योगेश गावित, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, साक्री- 90113-61165.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगाची
माहिती पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांचे आदेश
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये धुळे जिल्ह्यातील लम्पी स्कीन डीसिजच्या रोग प्रादुर्भावाची माहिती पशुपालक व इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतींनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखास, पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक आहे, अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिले आहेत.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये जिल्हाधिकारी यांना या अधिनियमाखालील अधिकार वापरण्यासाठी व कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहे. या अधिनियमातील कलम चारनुसार पशुपालक, इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतींनी रोग प्रादुर्भावाची माहिती त्वरीत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार अधिकार नसताना लसीकरण प्रमाणपत्र निर्गमित करणे किंवा सदोष लसमात्रा टोचणाऱ्या व्यक्ती, कायद्याशी सुसंगत नाही, अशी कृती करणाऱ्या किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांना अडथळा आणणाऱ्या व बाधित पशुधन किंवा शव नदी, तलाव, कॅनॉल व इतर पाण्याच्या स्त्रोतामध्ये टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
या कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यासाठी ग्रामपंचायत/स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखास/सचिवास प्राधिकृत करीत असल्याचेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटले आहे.
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा